नात्यांचं वास्तव

नात्यांचं वास्तव
मानवाने त्याच्या बुद्धीचा छान उपयोग करून प्राणिजगतात स्वत:चे विशेष स्थान बनविले आहे. इतर प्राणी कळपामध्ये राहतात. मानवाने समाजाची निर्मिती करून मानवी जिवनाला एक वेगळाच अर्थ दिलेला आहे.
निसर्गाने, जन्म देणारी जननी आणि जन्माला आलेली संतती, अशी दोनच नाती, तीही रक्ता-मासाची, देऊ केली पण कुटुंब केंद्रित समाजाची निर्मिती करून मानवाने असंख्य नाती निर्माण केली. आई व मूल यांचे संरक्षण करण्यासाठी पित्याचं नातं अस्तित्वात आलं जे कि इतर प्राण्यात दिसत नाही. माता-पिता-मूल यांचं कुटुंब तयार झालं. इतर प्राण्यांच्या तुलनेत शारिरीक दृष्ट्या मानव खूपच दुबळा प्राणी आहे. पण एकीचे मह्त्व ओळखल्यामुळे मानवाने टोळीपासून सुरुवात करून कुटुंबकेंद्रित समाज रचना स्थापन केली.
शेतीचे तंत्र समजू लागल्यावर मानवी टोळ्या स्थाईक होऊ लागल्या. खेडी, गावें, शहरे होता होता आता तर अतीमहानगरापर्यंत मानवी समाजाने प्रगती केलेली आहे.
कुटुंबाच्या निर्मितीमुळे आणखी रक्ताची नाती निर्माण झाली, जशी की भाऊ, बहिण, काका, मामा, मावशी, आत्या इत्यादि. प्रजननासाठी आवश्यक असलेलं नर-मादीचं नातं लग्नाच्या कायद्याने बांधूनच तर कुटुंब संस्था तयार झाली आहे. अशा लग्नामुळे नवरा-बायको, सासू-सासरे, सून, जावई, मेहुणा-मेहुणी इत्यादि कायदेशीर नाती अस्तित्वात आली. समाज स्थाईक झाल्यावर शेजारी, मित्र, सहकारी ही नाती निर्माण झाली.
आपल्या लक्षात आलं असेल की अस्तित्वाची लढाई हेच नाती निर्माण होण्याचे एकमेव कारण आहे. जान है तो जहाँ है, हे जाणूनच ही नाती टिकवून ठेवायची असतात.
पण कोणत्याही नात्याचा अस्तित्वाशी संबंध नसेल तर असं नातं मोडकळीस यायला वेळ लागत नाही.
राजेशाहीतील राजा-प्रजा हे नातं खूप ठिकाणी नष्ट होऊन लोकशाहीत प्रजाच राजा झाली आहे. एकाधिकारशाहीतील भिती संपली की लोकशाहीचा उदय होतो.
एकच आर्थिक स्रोत असलेल्या कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धती अनिवार्य असते. अशा कुटुंबात बाप-बेट्याचे नाते मुलांना टिकवून ठेवावेच लागते. पण मुले आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असतांनाही एकत्र कुटुंब पद्धती राबविणे बाप-बेट्यातील कलहाला कारणीभूत ठरते.
सासू-सून, हे नातं वाईट कारणासाठी प्रसिद्ध आहे. जोपर्यंत सून आर्थिकदृष्ट्या परावलंबी होती तोपर्यंत सासूचा छळ सहन करूनही सुनेला हे नातं टिकवावेच लागे. पारडं फिरून सासूची मोलकरिणही बनु शकते. नाकापेक्षा मोती जड असलेली सून घरी आली तर सासूचे काय होते हे आपण खूप साऱ्या कथा-कादंबऱ्यातून पाहिले आहे.
थोडक्यात म्हणजे नात्यातल्या दोन्हीकडचे कार्यक्षेत्र एकच असले तर अशी नाती प्रतिस्पर्ध्याची बनतात व कटुता निर्माण करतात. अशी कटुता शिगेला पोहोचली तर औरंगजेबी पुत्र व्हायला वेळ लागत नाही. सासू-सूनेचे कुप्रसिद्ध नाते मुलगा-सूनेच्या अगतिकतेमुळे तयार झाले. कुटुंब प्रमुखांनी मुलांची लग्ने झाल्यावर त्यांना स्वतंत्र कुटुंबाचा दर्जा दिला असता तर हे नातं कुप्रसिद्ध व्हायला वावच मिळाला नसता.
कुटुंब प्रमुखांच्या हाती असलेल्या सत्तेचं विभाजन करणं म्हणजे शेतीचे किंवा धंद्याचे विभाजन करणे, असा अर्थ घेतल्यामुळे कुटुंबप्रमुख अशा सता विभाजनाला तयार होत नसावेत. शेती-धंद्याचे विभाजन न करता उत्पनाचे विभाजन करण्याची शक्यता पडताळून पाहिलेल्यांनी कुटुंबातील कलहाची कारणेच नष्ट केली.
स्वार्थ हा मानवाचा स्थायी गुण आहे. प्रत्येक व्यक्तीचे निर्णय स्वार्थाच्या तराजूवर तोलले जातात. स्वार्थ साधल्यावरच दुसऱ्यांचा विचार केला जातो, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिले.
जोपर्यंत दोन व्यक्तींचे ’मार्ग’ एकमेकांना छेदित नाही तो पर्यंतच त्यांच्यात प्रेमळ नातं टिकू शकतं.
नात्यांचं हे वास्तव लक्षात घेतलं तर नात्यातून फोल अपेक्षा निर्माण होणार नाहीत व भविष्यात मन:क्लेश होणार नाहीत.

 

 

About Suhas Phanse

Suhaasa PhaNase is a poet whose Marathi Songs are showcased in Youtube to enable viewers not only to read his lyrics but also to sing the song to the tune he suggests with his voiceover. Audience of musical concerts are known to lip sing with the singer. Some even whisper sing and have to be politely silenced. Audience does not only listen but identifies with the musical rendering. Pleasure that audience gets by imagining that they themselves are singing is immense notwithstanding its vicarious nature. Purpose of streaming such videos is to provide new Marathi songs to sing for Marathi netizens. The visitor has many choices viz. Premgeete, Virahgeete, Bhajan, Bhaktigeete, Bhavgeete, Balgeete, Kishorgeete, Kumargeete, Shrungargeete, Badbadgeete, Deshbhaktigeete, Vivahgeete, Managalashtak, nisargageete, GondhaL, Jogava. Do forward this URL to your friends.
This entry was posted in Uncategorized and tagged , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

1 Responses to नात्यांचं वास्तव

यावर आपले मत नोंदवा